तलाठी भरती परीक्षेच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करावी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी

मुंबई, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या परीक्षेत एका उमेदवाराला 200 पैकी तब्बल 214 गुण पडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकरण स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सर्वांपुढे आणले आहे. तलाठी भरती परीक्षेत झालेल्या या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, परीक्षेतील हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

https://twitter.com/Mpsc_Andolan/status/1743657667296698746?s=19

घोटाळ्याची SIT चोकशी व्हावी!

यासंदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ट्विट करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये तलाठी भरती परीक्षेच्या निकालाची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने यामध्ये म्हटले की, “तलाठी परीक्षेत टॉपर विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाले आहेत. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि विद्यार्थांना गुण कसे पडले? 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत? हे सर्वांना समजले पाहिजे. या सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली आहे.

“सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या. आपल्याला फक्त लोकसेवा आयोगच न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससीकडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार. तलाठी भरतीत खूप मोठा घोटाळा झालाय, आमच्याकडे आता शेकडो पुरावे जमा झाले असून रोज त्यांचा खुलासा करण्यात येईल. तलाठी भरती मधील प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे, या घोटाळ्यांमुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये संताप असून, त्याचे उग्र रूप कधी समोर येईल ते सांगता येणार नाही. मंत्रालयात बसलेल्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना आणि महसूल मंत्र्यांना आमचा इशारा, आमच्या मागण्या तत्काळ मान्य करा,” अशी आक्रमक भूमिका स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने घेतली आहे.

विजय वडेट्टीवार आक्रमक!

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरती परीक्षेच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. “तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची SIT चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतय आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवलंय हे आता स्पष्ट होत आहे,” असे विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *