उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा जास्त असतो. यामुळे अनेकांना डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. आपले दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी डोळे हे शरीरातील अतिशय महत्त्वाचे अवयव आहेत. डोळ्यांना काही इजा झाली तर हालचालींवरच गदा येते. परंतु योग्य काळजी घेतल्यास उन्हाळ्यातही आपण डोळ्यांना चांगले ठेवू शकतो. डोळे येणे, डोळे लाल होणे, चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यांतून पाणी येणे अशा समस्या उन्हाळ्यात उद्भवतात. यामुळे या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही डोळ्यांची काळजी घेण्यासाठी घरगुती करु शकता.
– उन्हाळ्यात ऑफिससमध्ये नियमितपणे एसी लावण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात तर बाहेरचे तापमान वाढल्याने एसीचे तापमान फारच कमी करण्यात येते. या एसीमुळे आपल्याला गारवा वाटत असला तरी आसपासची हवा कोरडीच असते. त्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा येऊ शकतो. उन्हामुळे ज्याप्रमाणे डोळे कोरडे होतात तसेच सतत एसीमध्ये बसल्यानेही डोळे कोरडे होतात. यामुळे डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होतात. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्सचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
– उन्हाळ्यात एकूणच हवेतील तापमानामुळे शरीर आणि डोळेही कोरडे पडतात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे, पाणीदार फळे खाणे, सरबत, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा होऊ नये म्हणून आहाराकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे.
– सतत उन्हात असलो किंवा सतत स्क्रिनवर काम केले तर ठराविक वेळाने डोळ्यांचे व्यायाम करणे, डोळ्यांची उघडझाप करणे, डोळे पाण्याने धुणे असे उपाय करावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळू शकतो.
– तसेच डोळ्यांवर गार पाण्याच्या पट्ट्या, दुधाच्या पट्ट्या ठेवणे, गुलाब पाण्याच्या पट्ट्या ठेवणे हे डोळ्यांसाठी उत्तम राहते. काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्यानेही डोळ्यांना थंडावा मिळतो. तसेच कोरफडीच्या जेलचे आय मास्क हल्ली बाजारात मिळतात. हे आय मास्क घातले तरी डोळ्यांना आराम मिळतो.
– डोळ्यांचा कोरडेपणा, खाज किंवा चुरचुरणे यांसाठी ल्यूब्रिकेटींग आय ड्रॉप्स मिळतात. या ड्रॉप्सचा डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर केल्यास डोळ्यांच्या समस्या काही प्रमाणात दूर होण्यास मदत होते.
– त्वचा काळवंडू नये म्हणून आपण उन्हाळ्यात सनस्क्रीन लोशन लावतो. डोक्याला ऊन लागू नये किंवा केस खराब होऊ नयेत म्हणून आपण स्कार्फ वापरतो. त्याचप्रमाणे डोळ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चांगल्या प्रतीचा गॉगल घालून उन्हात जाणे डोळ्यासाठी उत्तम राहते.
– उन्हाळ्यात डोळे येणे, डोळ्यांतून घाण येणे, डोळे चिकटणे, रांजणवाडी येणे अशा अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी घरच्या घरी उपाय न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे असते. त्यामुळे लवकरात लवकर उपचार होऊन त्रास कमी होण्यास मदत होते.