टकारी समाज हा पारधी जातीची पोट जात?

बारामती, 4 फेब्रुवारीः टकारी समाज हा भामटा जातीची पोट जात नसून पारधी जातीची पोट जात आहे. त्यामुळे विमुक्त जातीच्या सूचीमध्ये त्याची स्वतंत्र नोंद करण्यात यावी, अशी मागणी टकारी समाजाच्या वतीने 2017 मध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाकडे करण्यात आली होती. या मागणी संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, संशोधन अधिकारी मेघराज भाटे बारामतीत 2 फेब्रुवारी 2023 रोजी आले होते. यावेळी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील उपस्थित होते. त्यांनी बारामतीतील टकारी समाज बांधवांची सुनावणी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच लवकरच हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन दिले.

टकारी समाज राज्यामध्ये उचले, कामठी, पाथरूट, घंटीचोर अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्या सर्वांची नोंद विमुक्त जातीच्या सूचीमध्ये टकारी या संज्ञखाली करण्यात यावी, अशी याचिका टकारी समाजाचे राज्याध्यक्ष नामदेव जाधव यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे केलेली आहे. यासंदर्भात मागील पाच वर्षात दोन वेळा सर्वेक्षण झाले, परंतु प्रश्न अद्याप निकाली निघाला नाही.

मतदानाविषयी जनजागृती करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन

नामदेव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य मागासवर्गीय आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रश्नाची सोडवणूक तातडीने व्हावी, याकरता सर्वेक्षण करून अहवाल त्वरित राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके व संशोधन अधिकारी मेघराज भाटे हे बारामती येथे आले होते.

टकारी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळतो का? जातीचे दाखले काढताना काही अडचणी येतात का? टकारी समाजाची सध्याची शैक्षणिक व सामाजिक स्थिती काय आहे? मुलींच्या शिकण्याचे प्रमाण किती टक्के आहे? टकारी समाजाने कोणता पारंपारिक व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे? टकारी समाज जातपंचायतीनुसार चालतो की प्रचलित कायद्याच्या आधारे चालतो? टकारी समाजाची बोलीभाषा कोणती? असे विविध प्रश्न आयोगाच्या प्रतिनिधी मार्फत विचारण्यात आले.

विद्या प्रतिष्ठानमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात टकारी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, टकारी समाज हा अनुसूचित जमातीचा भाग असतानाही शासनाच्या चुकीच्या नोंदीमुळे विमुक्त जातीमध्ये गणला गेला. त्यामुळे मूलभूत हक्कापासून तो वंचित आहे. समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उद्योग व्यवसायासाठी मिळत नाही. अशी खंत यावेळी टकारी समाज बांधवांनी व्यक्त केली.

उपस्थितांचे स्वागत टकारी समाजाचे राज्याध्यक्ष नामदेव जाधव यांनी केले, तर माजी उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, रणजीत गायकवाड, शिवदास जाधव,संतोष जाधव, बाळासाहेब गायकवाड, महेश गायकवाड, संजय जाधव, सुभाष जाधव, रमेश जाधव, सयाजी गायकवाड, शेखर गायकवाड सह अनेकांनी आपले म्हणणे मांडले. सूत्रसंचालन सुरेंद्र गायकवाड यांनी केले तर आभार ओंकार जाधव यांनी मानले. यावेळी मोठया प्रमाणात समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होते. अशी माहिती संतोष जाधव यांनी दिली.

One Comment on “टकारी समाज हा पारधी जातीची पोट जात?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *