T20 विश्वचषक स्पर्धा: भारताचा बांगलादेशवर 50 धावांनी विजय!

अँटिग्वा, 22 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारत आणि बांगलादेश यांच्यात शनिवारी सामना झाला. हा सामना वेस्ट इंडिजच्या अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात भारताने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. सुपर 8 मधील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयामुळे भारताने उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवामुळे बांगलादेशचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

https://x.com/BCCI/status/1804572959564276182?s=19

https://x.com/BCCI/status/1804547669823807977?s=19

भारताची 20 षटकांत 196 धावसंख्या

तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात बांगलादेशला 20 षटकांत 8 बाद 146 धावाच करता आल्या. या सामन्यात भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक नाबाद 50 धावांची खेळी केली. या सामन्याच्या सुरूवातीला कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी 3.2 षटकांत 39 धावांची भागीदारी केली. मात्र त्यावेळी रोहित शर्मा 11 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. तसेच विराट कोहलीने या सामन्यात 28 चेंडूत 37 धावांची खेळी केली. तर रिषभ पंत 24 चेंडूत 36 धावा करून बाद झाला.

https://x.com/BCCI/status/1804579382566211818?s=19

हार्दिक पांड्याचे नाबाद अर्धशतक

त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी 53 धावांची भागीदारी करून भारताची धावसंख्या 200 च्या जवळ नेली. या सामन्यात हार्दिक पांड्याने 27 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली. तर शिवम दुबे 24 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. या सामन्यात बांगलादेशकडून तनझिम हसन शाकिब आणि रिशाद हुसैन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर शाकीब अल हसन याने एक विकेट घेतली.

https://x.com/BCCI/status/1804562150935199911?s=19

बांगलादेश 20 षटकांत 8 बाद 146 धावा

प्रत्युत्तरात 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 षटकांत 146 धावाच करू शकला. बांगलादेशकडून शांतोने 32 चेंडूत सर्वाधिक 40 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त तन्झिद हसन 29 आणि रिशाद हुसेन याने 24 केल्या. भारताच्या भेदक गोलंदाजी पुढे त्यांच्या इतर फलंदाजांचा निभाव लागला नाही. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 आणि हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *