टी-20 वर्ल्डकप स्पर्धा; भारताने केला अमेरिकेचा पराभव!

न्यूयॉर्क, 13 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बुधवारी अमेरिका सोबत सामना झाला. या सामन्यात भारताने अमेरिकेचा 7 गडी राखून पराभव केला आहे. न्यूयॉर्क मधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात अमेरिकेने भारतासमोर भारतासमोर 111 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने त्यांचे हे लक्ष्य 18.3 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. भारताचा अर्शदीप सिंग या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला आहे. त्याने या सामन्यात 4 षटकांत 9 धावा देऊन 4 विकेट घेतल्या.

https://twitter.com/ICC/status/1800956058464034969?s=19

https://twitter.com/BCCI/status/1800955228868817375?s=19

अर्शदीप सिंगच्या 4 विकेट

तत्पूर्वी, आजच्या सामन्यात अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 8 बाद 110 धावा केल्या होत्या. यामध्ये अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक 27 धावा केल्या. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत अमेरिकेच्या 4 फलंदाजांना बाद केले. या सामन्यातील पहिल्याच षटकात त्याने अमेरिकेच्या 2 विकेट घेतल्या होत्या. या धक्क्यातून अमेरिकेचा संघ शेवटपर्यंत सावरला नाही. पण त्यावेळी नितीश कुमार आणि स्टीव्हन टेलर यांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे अमेरिकेला भारतासमोर 110 धावांचे लक्ष्य ठेवता आले. या सामन्यात अमेरिकेच्या नितीश कुमार 27 आणि स्टीव्हन टेलरने 24 धावा केल्या. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना जास्त काही करता आले नाही. तर या सामन्यात भारताकडून अर्शदीपने 4, हार्दिक पांड्याने 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

https://twitter.com/BCCI/status/1800954045370372605?s=19

सूर्यकुमार यादवचे नाबाद अर्धशतक

त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची देखील खराब सुरूवात झाली. संघाची 10 धावसंख्या असताना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या रुपाने भारताला दोन मोठे धक्के बसले. सौरभ नेत्रावळकरने या दोघांना बाद केले. या सामन्यात विराट कोहली शून्यावर, तर रोहित शर्मा 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर रिषभ पंत 18 धावा करून बाद झाला. त्यावेळी भारतीय संघ अडचणीत आला होता. परंतु, त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने नाबाद 72 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय असून, भारतीय संघाने आता स्पर्धेच्या सुपर एट फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने नाबाद 50 धावा केल्या. तर शिवम दुबे याने नाबाद 35 धावांची खेळी केली. तर अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने 2 आणि अली खान याने एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *