त्रिनिदाद, 27 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात आला. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला आहे. त्याचबरोबर आफ्रिकेने 2024 मधील टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. फायनलमध्ये प्रवेश करणारा दक्षिण आफ्रिका हा पहिला संघ ठरला आहे. तर आज रात्री 8 वाजता भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य फेरीतील सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यातून अंतिम सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
https://x.com/ICC/status/1806157139548971049?s=19
https://x.com/ProteasMenCSA/status/1806140064411402396?s=19
अफगाणिस्तान 56 धावांवर ऑल आउट!
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील आज झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजी पुढे अफगाणिस्तान संघाचा डाव 11.5 षटकांत केवळ 56 धावांत संपुष्टात आला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यावेळी अफगाणिस्तान संघाकडून अजमतुल्ला उमरझाईने सर्वाधिक 10 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सन आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर कागिसो रबाडा आणि ॲनरिक नोर्टजे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
https://x.com/ICC/status/1806157506831331542?s=19
मार्को जेन्सन सामनावीर ठरला
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 57 धावांचे हे माफक लक्ष्य 8.5 षटकांत पूर्ण केले. यावेळी दक्षिण आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावून 60 धावा करून हा सामना जिंकला. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तत्पूर्वी, 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 5 धावसंख्या असताना क्विंटन डी कॉक च्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला फजलहक फारुकीने 5 धावांवर बोल्ड आऊट केले. त्यानंतर या सामन्यात रीझा हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्कराम यांनी दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची नाबाद भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. यावेळी रीझा हेंड्रिक्सने 29 आणि एडन मार्करामने 23 धावा केल्या. मार्को जेन्सन याला या सामन्याचा प्लेअर ऑफ मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या सामन्यात 3 षटकांत 16 धावा देऊन अफगाणिस्तानचे 3 फलंदाज बाद केले.