दिल्ली, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसीने टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार असून, वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहे. या टी-20 विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळविण्यात येणार आहे. तर या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
https://twitter.com/T20WorldCup/status/1743275741918199988?s=19
एकूण 55 सामने खेळवले जाणार
टी-20 विश्वचषक 2024 ही स्पर्धा 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 20 संघ खेळणार आहेत. हे सर्व 20 संघ 4 गटात विभागले गेले आहेत. या विश्वचषकात एकूण 55 सामने खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. तर या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना 9 जूनला
या स्पर्धेतील भारताचा सलामीचा सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध होणार आहे. दरम्यान, या टी-20 विश्वचषक स्पर्धेत 4 गट करण्यात आले आहेत. यांतील प्रत्येकी एका गटात 5 संघांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी भारत आणि पाकिस्तान हे संघ ग्रुप ए मध्ये आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जुन रोजी साखळी फेरीतील सामना खेळविण्यात येणार आहे.
विश्वचषकात असे 4 गट असणार!
ग्रुप ए – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका.
ग्रुप बी – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान.
ग्रुप सी – न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी.
ग्रुप डी – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ.