फ्लोरिडा, 15 जून: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि कॅनडा यांच्यात आज सामना रंगणार आहे. हा सामना फ्लोरिडा मधील मैदानावर रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. परंतु, या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. फ्लोरिडामधे पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येथील खराब हवामानामुळे या मैदानावरील पहिले दोन सामने वाहून गेले आहेत. फ्लोरिडातील खराब हवामान आणि पावसामुळे श्रीलंका विरुद्ध नेपाळ, तसेच यूएसए विरुद्ध आयर्लंडचा सामना रद्द झाला आहे. यातील यूएसए विरुद्ध आयर्लंड हा सामना रद्द झाल्यामुळे याचा फटका पाकिस्तान संघाला बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ 2024 च्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
https://twitter.com/StarSportsIndia/status/1801796773717098795?s=19
https://twitter.com/ICC/status/1801618991141519399?s=19
आजच्या सामन्यात पाऊस येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. फ्लोरिडातील लॉडरहिल येथे आज होणाऱ्या भारत विरुद्ध कॅनडा या सामन्यात पाऊस अडथळा ठरण्याची शक्यता आहे. दुपारपासून ते सायंकाळपर्यंत तेथे खराब हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजे आजच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, याच मैदानावर काल यूएसए आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना रद्द झाला. याचा फायदा यूएसए संघाला झाला. यूएसएचा संघ आता स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये पोहोचला आहे.
टीम इंडिया सुपर 8 मध्ये
दरम्यान भारताचा आज सामना झाला नाही तर, त्यामुळे भारतीय संघाचे कसलेही नुकसान होणार नाही. भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना भारतीय संघासाठी केवळ औपचारिकता आहे. कारण, भारतीय संघाने यापूर्वीच संघाने सुपर 8 मध्ये स्थान मिळवले आहे. भारताचा सकाळी फेरीतील हा अखेरचा सामना आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अ गटातील गुणतालिकेत भारतीय संघ सध्यात 6 गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर 5 गुण मिळवून यूएसएचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. अ गटातील हे दोन्ही संघ स्पर्धेच्या सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर या गटातील पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंड या संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.