बारामती, 16 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. याची माहिती मंगळवारी (दि.15) निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ कायम चर्चेत असतो. या निवडणूकीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात किती मतदार आणि मतदार केंद्र असणार? तसेच या निवडणुकीसाठी बारामती तालुक्यात निवडणूक आयोगाने कशाप्रकारे तयारी केली आहे. याची सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊया.
मतदार आणि मतदान केंद्रांची संख्या
बारामती विधानसभा मतदारसंघातील सध्याची लोकसंख्या अंदाजे 5 लाख 41 हजार 893 इतकी आहे. यामध्ये एकूण मतदारांची संख्या 3 लाख 75 हजार 712 आहे. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या 1 लाख 90 हजार 841, तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 84 हजार 290 असून, इतर 21 मतदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात एकूण मतदान केंद्रांची संख्या 386 इतकी आहे. यामध्ये जळोची मतदान केंद्रावर सर्वाधिक 1 हजार 450 मतदार आहेत. तर कमीत कमी मतदार संख्या असणारे नेपतवळण हे मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर 271 मतदार आहेत. तसेच या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात कोणतेच अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही, याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दिव्यांग मतदारांची संख्या किती?
बारामती मतदासंघात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 4 हजार 654 इतकी आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी बारामती मतदासंघात विविध ठिकाणी दिव्यांग मतदान केंद्र उभारले जाणार आहेत. तसेच निवडणूक प्रशासनाकडून दिव्यांग व 85 वर्षांहून अधिक वय असलेल्या वयोवृद्ध मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सुविधा उपलब्ध देण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष वाहनांची सोय करण्यात आली आहे.
विशेष मतदान केंद्रांचा समावेश
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदानाच्या दिवशी बारामती मतदारसंघात देखील विशेष मतदान केंद्र असणार आहेत. यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग मतदान केंद्र, महिला मतदारांना मतदान केंद्राकडे आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्र, तरूण मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी युवा मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या
या मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या 3 हजार 170 इतकी असणार आहेत. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. या मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 60 जीप, 47 बस, 15 मिनीबस आणि 3 कंटेनर यांचा समावेश आहे.
ईव्हीएम सुरक्षा कक्ष उभारण्यात येणार
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून बारामती मतदारसंघात ईव्हीएम सुरक्षा कक्ष उभारण्यात येणार आहे. बारामती तहसिल कार्यालयाचा दुसरा मजला याठिकाणी प्रशिक्षणासाठी ईव्हीएम ठेवण्यात येणार आहेत. तर मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूमचे ठिकाण बारामती एमआयडीसी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम क्रमांक 3 हे असणार आहे. तसेच या ठिकाणी मतदान साहित्य वाटप व स्विकृती केंद्र उभारण्यात येणार आहे.