मुंबई, 12 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या एसटी बसमध्ये एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दत्तात्रय गाडे या आरोपीला न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे. ही घटना 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यावेळी या आरोपीने पीडित तरूणीला फसवून या बसमध्ये नेले आणि तिच्यासोबत हे कृत्य केले होते.
https://x.com/PTI_News/status/1899775689286709301?t=ctlmbjFl9DrzzLRP6WR4Lw&s=19
काय आहे प्रकरण?
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यादिवशी ही पीडित तरूणी आपल्या मूळ गावी म्हणजेच सातारा तालुक्यातील फलटण येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात बसची वाट पाहत होती. त्याचवेळी आरोपीने पीडित तरूणीशी ओळख वाढवून तिला फसवून सांगितले की, ती ज्या गावाला जाणार आहे, त्या मार्गावरील बस दुसरीकडे लागली आहे. असे सांगून आरोपीने या तरूणीला डेपोत थांबलेल्या एका बसमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला होता.
14 दिवसांची पोलीस कोठडी
या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. यासंदर्भात पीडित तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. दत्तात्रय गाडे असे या आरोपीचे नाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तैनात केली होती. अखेर 3 दिवसांनी या आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुणाट या गावातून अटक केली. त्यानंतर या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज हा कालावधी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपी दत्तात्रय गाडे याला 26 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
चार अधिकारी निलंबित
या घटनेमुळे खळबळ उडाली असून, बस स्थानकांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करून 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. त्यानुसार, आज 36 पानांचा चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालाच्या आधारे आज 4 जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच या प्रकरणात जर कोणी दोषी असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणी वरिष्ठ आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक सुनील येळे, तसेच सहायक वाहतूक अधीक्षक मोहिनी ढगे या चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.