प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन

मुंबई, 02 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. त्यानंतर विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तत्पूर्वी, लोकसभेत काल लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वासंदर्भात वक्तव्य केले होते.

https://x.com/ANI/status/1808065115318599894?s=19

सभागृहात शिवीगाळ

राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे पडसाद काल विधान परिषदेत उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नेते आमनेसामने आले होते. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले. यादरम्यान अंबादास दानवे यांनी सभागृहातच प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रसाद लाड यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी केली होती. यासंदर्भात प्रसाद लाड यांनी आज विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. याप्रकरणी अंबादास दानवे यांनी राजीनामा देऊन सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली होती.

https://x.com/PrasadLadInd/status/1808072484668706873?s=19

प्रसाद लाड यांच्याकडून कारवाईचे स्वागत

दरम्यान, अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी ट्विट करत या कारवाईचे स्वागत केले आहे. “अंबादास दानवे यांचे विधान परिषदेतील निलंबन हा विधिमंडळाच्या नियमावलीचा विषय आहे! हे निलंबन झाले, हा सत्याचा विजय आहे! मी याबाबत एवढच सांगू इच्छितो, यापुढे सभागृहात अशी भाषा वापरण्याचे कृत्य कोणीही करू शकणार नाही! त्यामुळे झालेले निलंबन योग्यच आहे!” असे प्रसाद लाड यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *