बदलापूर प्रकरणात पोलिसांवर निलंबनाची कारवाई, देवेंद्र फडणवीसांचे आदेश

बदलापूर, 20 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, बदलापूरच्या घटनेत गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबित करण्याची कारवाई उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बदलापूर प्रकरणात प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

https://x.com/Devendra_Office/status/1825850718558814312?s=19

एसआयटी समिती स्थापन

तत्पूर्वी, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणातील दोषीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, ज्या शाळेवर ही घटना घडली त्या शाळेवरही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

https://x.com/ANI/status/1825844618165940339?s=19

सकाळपासून आंदोलन सुरू

बदलापूर येथील या घटनेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या आंदोलकांनी आज सकाळपासून बदलापूर येथे रेल्वे रोको आंदोलन केले आहे. त्यांचे हे आंदोलन गेल्या 7 तासांपासून सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी या आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन येथे जाऊन या आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, आंदोलकांनी मागे हटण्यास नकार दिला आहे.

https://x.com/ANI/status/1825843628419461473?s=19

गिरीश महाजन काय म्हणाले?

यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अशी घटना आहे की त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. पण रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. हजारो लोक याचा वापर करतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एसटी समिती स्थापन केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि ती जलदगतीने होईल. गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी आमचीही इच्छा आहे. ज्यांनी या प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणा केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *