बारामती, 17 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भाजप आमदार सुरेश धस यांनी आज (दि.17) बारामती येथे आयोजित ‘कृषिक 2025’ या प्रात्यक्षिकयुक्त कृषी प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी शेतीसाठी उपयुक्त असलेल्या आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीची सविस्तर माहिती घेतली. याप्रसंगी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, विविध कृषी तज्ञ आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
https://x.com/SureshDhasBJP/status/1880182477936844890?t=NClHhC4eVvYJIjO2xXqfWA&s=19
सुरेश धस यांनी केले कौतुक
या कृषी प्रदर्शनाच्या अनुभवाबद्दल बोलताना सुरेश धस म्हणाले, “शेतीतील सर्व माहिती आणि तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी बारामतीत येणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती अधिक सक्षम आणि परिणामकारक कशी करता येईल, याची सविस्तर माहिती येथे दिली जाते. भविष्यातील शेतीसाठी काय महत्त्वाचे आहे याचा विचार करून येथे नवतंत्रज्ञान सादर केले जात आहे.” तसेच यावेळी त्यांनी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. “राजेंद्र पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केलेले काम खरोखरच उल्लेखनीय आहे. हे प्रदर्शन महाराष्ट्रातील शेतीच्या विकासाला चालना देणारे ठरेल,” असे सुरेश धस म्हणाले.
बारामती कृषिक 2025 प्रदर्शन
बारामतीच्या माळेगाव खुर्द येथील कृषी विज्ञान केंद्रात ‘कृषिक 2025’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांसाठी उपयोगी साधनांची माहिती देण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. या प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान, एआय आधारित शेती, यंत्रसामग्री, सिंचन प्रणाली, सेंद्रिय शेती पद्धती आणि ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या प्रात्यक्षिकांची माहिती देण्यात येत आहे. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात शेतकऱ्यांना तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळते.
येथे विविध कृषी उत्पादने, बी-बियाणे, खते आणि कीड नियंत्रणाचे उपाय दाखवले जातात. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? याबद्दल मार्गदर्शन मिळते. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रातील नवीनतम बदलांचा, पाण्याचा काटकसरी वापर करणाऱ्या प्रणालींचा आणि हवामानावर आधारित पीक व्यवस्थापनाचे ज्ञान मिळते. तसेच तेथे विविध प्रकारचे पशुधन पहावयास मिळते. हे प्रदर्शन महाराष्ट्रातील शेतीसाठी प्रेरणादायी ठरते. तसेच कृषिक 2025 प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांचा शेतीबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. हे कृषिक 2025 प्रदर्शन 16 जानेवारीपासून सुरू झाले असून ते 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषिक 2025 प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.