हिंजवडी आयटी पार्क येथील वाहतुक कोंडी संदर्भात सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांना पत्र

पुणे, 10 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. पुणे शहरातील हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी या पत्रातून केली आहे. जागतिक दर्जाचे आयटी हब असणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क येथील दळणवळण व्यवस्था खराब रस्त्यांमुळे कोलमडली आहे. विशेषतः भुमकर चौक परिसरातील परिस्थिती तर अतिशय कठीण आहे. यामुळे शहराच्या विविध भागांतून येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बराच वेळ हा वाहतूक कोंडीत जातो. ही अतिशय खेदजनक व तितकीच गंभीर बाब आहे. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की, कृपया या आयटी पार्कचे महत्त्व लक्षात घेता येथील रस्त्यांची दुरूस्ती करावी. तसेच आवश्यक तेथे रस्त्यांचे रुंदीकरण करून पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. असे सुप्रिया सुळे यांनी यामध्ये म्हटले आहे.

https://x.com/supriya_sule/status/1821925502485196905?s=19

वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्यात

बारामती लोकसभा मतदार संघातील जागतिक दर्जाचे आयटी हब अशी ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथील ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नागरिकांची सुरक्षितता यांसारख्या पायाभूत सुविधा गतीने पूर्ण करण्यात याव्यात. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. माण, मारूंजी, म्हाळूनगे, भूमकर चौक या मार्गावरून पुण्यातील विविध भागातून उद्योग, नोकरी निमित्त हिंजवडी आयटी परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत या ठिकाणचे रस्ते अरूंद आहेत. त्याचबरोबर या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. येथील रस्त्यांना लहान मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामूळे हे रस्ते अधिकच खड्डेमय आणि चिखलमय झाले आहेत. काही ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडी होत आहे. भूमकर चौकात उड्‌डाणपूलाखाली मोठे तळे साचत आहे. यांसारख्या कारणांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नोकरी निमित्त येणाऱ्या नागरिकांना दररोज 2 ते 3 तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे, असे त्यांनी यात म्हटले आहे.

अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करावी

वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या भागातील रस्त्यांची सुधारणा करणे, रस्ते रुंद करणे, आवश्यक ठिकाणी उड्‌डाणपूल बांधणे, वाहतूक मार्गात बदल करणे, सर्विस रस्त्यांची रुंदी वाढविणे, रस्त्यांवरील खड्डे भरणे, दुभाजक आणि पदपथांच्या दुरूस्तीची कामे करणे यांसारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर एमआयडीसी परिसराबाहेरील काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उभारावी. तसेच हिंजवडी परिसर व एमआयडीसी येथील या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, पीएमसी, पीसीएमसी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन व इतर संबंधित शासकीय यंत्रणांची संयुक्तिक बैठक आयोजित करावी. तसेच या परिसराची पाहणी करून या परिसराचा विकास करण्यासाठी त्याचा विकास आराखडा करण्यात यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *