जनतेने दिलेला कौल अतिशय नम्रपणे स्वीकारत आहोत, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 25 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ 46 जागा जिंकता आल्या. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 16 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला फक्त 10 जागा जिंकण्यात यश आले. दरम्यान, निवडणुकीतील या पराभवानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. “विधानसभा निवडणुकीत जनतेने जो कौल दिला तो अतिशय नम्रपणे आम्ही स्वीकारत आहोत. आता जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी आपल्या मूल्यांसाठी प्रांजळपणे काम करत राहू,” असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

https://x.com/supriya_sule/status/1860689409948910053?t=TUm0v_vN1XITkt_uTuAkzA&s=19

सुप्रिया सुळे यांनी काय म्हटले?

” विधानसभा निवडणुकीत मायबाप जनतेने जो कौल दिला तो अतिशय नम्रपणे आम्ही स्वीकारत आहोत. या निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू आणि भविष्यातील सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहू. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण व समाजातील प्रत्येक घटकांच्या हक्काची व स्वाभिमानाची लढाई आम्ही खंबीरपणे कायम लढत राहू. आता जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी आपल्या मूल्यांसाठी प्रांजळपणे काम करत राहू आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची ही पालखी निष्ठेने, सर्व शक्तीनिशी पुढे नेऊ.” असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.



“या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी आपण काम कराल ही अपेक्षा आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी, निवडणूक आयोग, निवडणूक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासन, प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आदी सर्वांनी सक्रिय योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव जागता ठेवून पार पाडला, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद,” असे सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *