मुंबई, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल दिला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर सहा महिन्यांपासून अधिक काळ सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली. ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्याच हातातून पक्ष काढून घेणे हे इतिहासात प्रथमच घडलेले आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1754899433030885620?s=19
https://twitter.com/NCPspeaks/status/1754899729136193797?s=19
मराठी माणसाच्या विरोधातले हे षडयंत्र: सुप्रिया सुळे
निवडणूक आयोगाच्या या निकालात मला काहीच आश्चर्य वाटत नाही. कारण हे मला अपेक्षित असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विरोधी सत्ताधीशांच्या कारवाया, अदृश्य शक्तीचे मराठी माणसाच्या विरोधातले हे षडयंत्र आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांना देखील असेच केले. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठी माणसाचा पक्ष, त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात आणि शरद पवार यांच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्तीचे निर्णय घेत असते. त्याचे आणखी एक उदाहरण असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबासोबत जे झाले, तेच षडयंत्र शरद पवारांच्या कुटुंबासोबत होत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.
आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार: सुप्रिया सुळे
शरद पवारांनी शून्यातून पक्ष उभा केला, शून्यातून राजकीय परिस्थिती निर्माण केली, त्यांचे कोणीही काका-मामा राजकारणात नव्हते. शरद पवारांनी त्यांचे सगळे राजकीय आयुष्य हे शून्यातून उभे केलेले आहे. असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले. आमदारांच्या आकड्यावरून पक्ष हा ठरत नसतो. पक्ष ही संघटना ठरवत असते, त्यामुळे अर्थातच संघटना ही शरद पवार यांच्या सोबत आहे. त्यामुळे या ऑर्डरच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
आमच्या केसमध्ये घटनेप्रमाणे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. या सर्व गोष्टी अदृश्य शक्तीमुळे झालेल्या आहेत, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. शरद पवार यांच्यासह सर्वसामान्य जनतेवर हा अन्याय आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकतीने लढू, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.