बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे 1 लाख 58 हजार 333 मतांनी विजयी

बारामती, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे यांचा हा सलग चौथा विजय आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांचा 1 लाख 58 हजार 333 मतांनी पराभव केला आहे. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ सुरूवातीपासूनच सर्वाधिक चर्चेत होता. कारण, या मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होत होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर या लढतीत सुप्रिया सुळे विजयी ठरल्या आहेत.

https://twitter.com/NCPspeaks/status/1798002248938831905?s=19

पाहा कोणाला किती मतदान झाले?

यंदाच्या निवडणुकीत यंदा बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 38 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक 7 लाख 32 हजार 312 इतकी मते मिळाली. यामध्ये सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या या मतदानाची टक्केवारी 51.85 टक्के इतकी होती. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना 5 लाख 73 हजार 979 मते मिळाली. त्यांच्या मतदानाची टक्केवारी 40.64 टक्के इतकी होती. तसेच या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातील 9 हजार 151 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

नणंद-भावजय यांच्यात होता सामना

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याचे कळल्यापासून बारामती मतदारसंघ सातत्याने चर्चेत होता. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत दोन्ही पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी बारामतीतील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली. तसेच दोन्ही पक्षांतील नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील गावे अक्षरशः पिंजून काढली. परंतु, यामध्ये शरद पवार गटाला यश मिळाले. या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी प्रचंड मताने विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *