वारजे, 08 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभेसाठी बारामती मतदारसंघातील पुण्यातील वारजे येथे काल मतदान पार पडले. या मतदानानंतर वारजे परिसरात तीन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना काल रात्री उशीरा घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री उशीरा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वारजे परिसरात हवेत गोळीबार केला. त्यानंतर ते सर्वजण फरार झाले आहेत. सध्या त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तर या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे येथे काल काही अज्ञात लोकांनी हवेत गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघात अशा प्रकारे लोकशाहीच्या प्रक्रियेत दहशत माजविण्याचा प्रकार घडला नव्हता. मतदारसंघात यापुर्वीही मतदारांना धमकाविण्याचे प्रकार सर्रासपणे घडले आहेत. त्यात या… https://t.co/UfaNJJ7RzK
— Supriya Sule (@supriya_sule) May 8, 2024
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी वारजे परिसरात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून, त्याचा आम्ही सर्वजण घोर निषेध करीत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यामध्ये म्हटले आहे. तसेच हा गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे येथे काल काही अज्ञात लोकांनी हवेत गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघात अशा प्रकारे लोकशाहीच्या प्रक्रियेत दहशत माजविण्याचा प्रकार घडला नव्हता. मतदारसंघात यापुर्वीही मतदारांना धमकाविण्याचे प्रकार सर्रासपणे घडले आहेत. त्यात या गोळीबाराच्या घटनेची भर पडली आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून त्याचा आम्ही सर्वजण घोर निषेध करीत आहोत. निवडणूक आयोगाने व पोलीस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी,” असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.