बारामती, 09 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती मतदार संघात सध्या पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या नणंद – भावजय यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मात्र खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनी गळाभेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडिओ
कमळेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी नेत्या बारामती तालुक्यातील जळोची येथील कमळेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी समोरासमोर येताच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनी गळाभेट घेतली. यावेळी त्यांनी हसत हसत एकमेकींशी संवाद साधला. त्यामुळे हे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेले कार्यकर्ते देखील आश्चर्य चकित झाले होते. दरम्यान, सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होणार?
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले होते. त्यामुळे शरद पवार यांना त्यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले. तसेच शरद पवार यांना तुतारी हे पक्षचिन्ह मिळाले आहे. या चिन्हावर शरद पवार गटाचे उमेदवार आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण, राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर बारामती मतदार संघातून यावेळेस पवार विरुद्ध पवार हे चित्र पाहायला मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर त्यांना आपली नणंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र, याचा फैसला सध्यातरी झालेला नाही. त्यामुळे बारामती मतदार संघाच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.