सुप्रीम कोर्टाचा ‘एसबीआय’ ला धक्का; उद्यापर्यंत इलेक्टोरल बाँड्सचे तपशील सादर करण्याचे दिले आदेश

नवी दिल्ली, 11 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँड्सचे तपशील सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा स्टेट बँक ऑफ इंडियाचा अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाला आता 12 मार्च रोजी कामाचे तास संपेपर्यंत इलेक्टोरल बाँड्सचे तपशील निवडणूक आयोगासमोर सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे स्टेट बँकेला इलेक्टोरल बाँड्स सादर करण्यासाठी उद्यापर्यंतचाच अवधी मिळाला आहे.

सुप्रीम कोर्टाने दिले निर्देश

स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्टोरल बाँड्सचा तपशील उद्या निवडणूक आयोगासमोर सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भातील माहिती 15 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्याचे निर्देश देखील यावेळी सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तत्पूर्वी, गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बाँड योजना असंवैधानिक असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला होता. तसेच सर्व राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँड्सद्वारे मिळालेल्या देणग्यांबद्दल माहिती शेअर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला 6 मार्चपर्यंतची मुदत दिली होती.

सुप्रीम कोर्टाने अर्ज फेटाळला

मात्र, इलेक्टोरल बाँड्सचा तपशील सादर करण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती स्टेट बँकेने कोर्टाकडे केली होती. यासंदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने आज त्यांचा हा अर्ज फेटाळून लावत इलेक्टोरल बाँड्सचा तपशील उद्यापर्यंत सादर करण्याचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *