दिल्ली, 20 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनल हॅक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनल हॅक केल्यानंतर हॅकर्सकडून त्या युट्युब चॅनलवर रिपल लॅब या अमेरिकन कंपनीने विकसित केलेल्या क्रिप्टोकरन्सीचे व्हिडिओ दाखवले जात होते. या पार्श्वभूमीवर, सुप्रीम कोर्टाने त्यांचे यूट्यूब चॅनल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील निवेदन सुप्रीम कोर्टाने प्रसिद्ध केले आहे.
https://x.com/ANI/status/1837068409449894115?s=19
यूट्यूब चॅनेल लवकरच सुरू
“सर्व संबंधितांना कळविण्यात येत आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल काढून टाकण्यात आले आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवरील सेवा लवकरच पुन्हा सुरू केल्या जातील,” असे सुप्रीम कोर्टाने या निवेदनात म्हटले आहे. तत्पूर्वी, यूट्यूब चॅनल हॅक केल्यानंतर हॅकर्सनी या चॅनलला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी रिपल असे नाव दिले होते. तसेच या चॅनलवर सुप्रीम कोर्टाच्या व्हिडिओंऐवजी क्रिप्टोकरन्सी चे व्हिडिओ दाखवले जात होते.
हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, जगभरात सध्या सायबर क्राईम आणि हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. या प्रकारामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. सुप्रीम कोर्टाकडे अनेक मोठ्या खटल्यांच्या सुनावणीच्या संबंधित कागदपत्रे आणि त्यांची माहिती आहे. अशा परिस्थितीत जर हॅकर्सनी यूट्यूबसारखी सोशल मीडिया साईट हॅक केली तर महत्त्वाची कागदपत्रे किंवा माहिती लीक होण्याचा धोका देखील वाढू शकतो. सुदैवाने अद्याप तसे काहीच झालेले नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांचे हे यूट्यूब चॅनल बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे यूट्यूब चॅनल लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितले आहे.