झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; अटकेच्या विरोधातील याचिका फेटाळली

रांची, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात सात तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी ईडीने केलेल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ईडीच्या अटकेला आव्हान देणारी हेमंत सोरेन यांची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

https://x.com/ANI/status/1753285297427857679?s=20

https://x.com/ANI/status/1753284459322040752?s=20

खटल्याची सुनावणी करण्यास नकार

ईडीची अटक बेकायदेशीर असून आपणास जामीन मिळावा, यासाठी हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हेमंत सोरेन यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. यावेळी त्यांची ही याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करण्यास नकार दिला. त्यावेळी न्यायालयाने त्यांना तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? असा सवाल केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने यावेळी हेमंत सोरेन यांना झारखंड उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे हेमंत सोरेन यांना जामीनासाठी आता झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार आहे.

बुधवारी अटक करण्यात आली होती

दरम्यान, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना ईडीने लगेचच अटक केली होती. हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर चंपाई सोरेन हे आज झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *