नवी दिल्ली, 24 मे: (विश्वजीत खाटमोडे) सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलासा दिला आहे. मतदानाची आकडेवारी 48 तासांत जाहीर करण्याच्या याचिकेवर अंतरिम निकाल देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मतदान संपल्यानंतर 48 तासांच्या आत फॉर्म 17 सी चा डेटा वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. सध्या लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे झाले आहेत. आता ही प्रक्रिया बदलण्यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणणे योग्य होणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1793888179424231439?s=19
https://twitter.com/ANI/status/1793896594091512009?s=19
याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने सदर याचिकेत म्हटले होते की, निवडणूक आयोग 2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यास बराच विलंब करत आहे. त्यामुळे आकडेवारीत मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने अनेक दिवसांनी आकडेवारी प्रसिद्ध केली. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी झाले. त्याचा डेटा 11 दिवसांनंतर प्रसिद्ध झाला. दुसऱ्या टप्प्यातील 26 एप्रिल रोजी मतदान झाले. त्याचा डेटा चार दिवसांनंतर प्रसिद्ध झाला.” निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी जाहीर केलेल्या सुरुवातीच्या आकड्यांमध्ये आणि अंतिम आकड्यांमध्ये 5 टक्क्यांहून अधिक फरक होता. निवडणूक आयोगाने खरी आकडेवारी जाहीर करण्यास अनेक दिवसांचा विलंब केल्याने मतदारांच्या मनात शंका निर्माण होत आहे. अशा स्थितीत मतदानानंतर लगेचच मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला द्याव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून केली होती.
निवडणूक आयोगाची भूमिका काय?
यासंदर्भात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. फॉर्म 17 सी वर आधारित मतदानाचा डेटा उघड केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे गैरप्रकार निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला हानी पोहोचवू शकते, ज्यामुळे लोकांमध्ये निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण होईल. असे निवडणूक आयोगाने या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या संदर्भातील याचिकेवर आज कोणताही निर्णय देण्यास नकार दिला आहे. आता ह्या याचिकेवर उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुनावणी होणार आहे.