धनगर समाजाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

नवी दिल्ली, 20 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे धनगर समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी धनगर समाजाकडून गेल्या अनेक वर्षांपासून विविध आंदोलने करण्यात आली आहेत.

हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला

यापूर्वी धनगर समाजाची याचिका मुंबई हायकोर्टाने ही फेटाळली होती. त्यानंतर धनगर समाजाने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. बाहेरच्या काही राज्यांत धनगड समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण आहे. राज्यातील धनगर आणि धनगड एकच असून, केवळ टायपिंग चुकीमुळे धनगर आणि धनगड असे दोन नाव पडले आहेत. त्यामुळे धनगर समाजाला देखील धनगड समाजाप्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी धनगर समाजाने या याचिकेतून केली होती. परंतू, सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवत त्यांची ही याचिका फेटाळून लावली. यावेळी सुप्रीम कोर्टाने देखील धनगर आणि धनगड हे वेगळे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील धनगर समाजाला सध्या एनटी (भटक्या जमाती) प्रवर्गातून आरक्षण आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1781560078996541578?s=19

रोहित पवार यांचे ट्विट

सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. “धनगर किंवा मराठा व इतर समाजांना कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारला घटनादुरुस्ती करूनच ते द्यावं लागेल. पण ज्यांना आरक्षणच संपवायचंय त्या भाजपकडून हा प्रश्न सुटूच शकत नाही. भाजपला फक्त आश्वासनांचं गाजर दाखवून सत्तेचा हलवा खायचाय. त्यामुळं वेगवेगळ्या समाजांचा आरक्षणाचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लावायचा असेल तर पहिल्यांदा भाजपला सत्तेतून खाली खेचावंच लागेल, यात कोणतीही शंका नाही. आता प्रश्न उरतो की, धनगर आरक्षणाची याचिका कोर्टाने फेटाळल्यानंतर या प्रश्नाचं निव्वळ राजकारण करणारे चाणक्य आणि चॉकलेट हिरो आज कुठं आहेत?” असे रोहित पवार या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *