दिल्ली, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पतंजली आयुर्वेद कंपनीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी योगगुरू रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. तसेच याप्रकरणी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यासोबतच सुप्रीम कोर्टाने यावेळी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना देखील कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. यावेळी रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण या दोघांना सुप्रीम कोर्टात हजर रहावे लागणार आहे. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
https://x.com/ANI/status/1769961165785104493?s=20
अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करू नये?
या आधीच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने योगगुरू रामदेव बाबा यांना नोटीस बजावून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी दिशाभूल करणाऱ्या पतंजली आयुर्वेद या आयुर्वेदिक कंपनीच्या जाहिरातींवरही बंदी घालण्यात आली होती. सोबतच सुप्रीम कोर्टाने यावेळी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण आणि रामदेव बाबा यांना याप्रकरणी तीन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र, त्यांच्याकडून कोर्टाला कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळाले नव्हते. त्यामुळे आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा यांच्यासह आचार्य बालकृष्ण यांना फटकारले आहे. कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई का करू नये? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने यावेळी केली आहे. तसेच आचार्य बालकृष्ण आणि योगगुरू रामदेव बाबा यांना अवमान नोटीसला उत्तर न दिल्याने पुढील सुनावणीच्या तारखेला हजर राहण्यास सांगितले आहे.
जाहिरातींवर बंदीचे आदेश
दरम्यान, पतंजली आयुर्वेद या कंपनीच्या जाहिराती फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे. या जाहिरातींच्या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने पतंजली कंपनीला त्यांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. जर या आदेशाचे पालन केले नाही तर कंपनीच्या सर्व उत्पादनांवर प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असा इशारा त्यावेळी सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला दिला होता.