नवी दिल्ली, 15 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेला आणि त्यांच्या रिमांडला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. ईडीने 24 एप्रिलपर्यंत या नोटीसीला उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 29 एप्रिल रोजीच्या आठवड्यात सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे. सोबतच सुप्रीम कोर्टाने आज अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 23 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
https://twitter.com/ANI/status/1779778885627888066?s=19
https://x.com/ANI/status/1779778279274348968
अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून रोखण्यासाठी अटक करण्यात आली असल्याचा दावा केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आजच्या सुनावणीत केला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकर घेण्याची मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी केली आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 29 एप्रिलपूर्वी होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू धोरणाशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली होती. याप्रकरणी वारंवार समन्स बजावून देखील केजरीवाल हे ईडीसमोर हजर झाले नाहीत. तसेच त्यांनी ईडीला तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळे ईडी त्यांना अटक केली. केजरीवाल यांना सध्या कोर्टाने 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल हे आता दिल्लीतील तिहार कारागृहात आहेत. तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तेंव्हा हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत सुप्रीम कोर्ट अरविंद केजरीवाल यांना दिलासा देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.