दिल्ली, 11 जून: (विश्वजीत खाटमोडे) नीट-यूजी 2024 या वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील पेपर फुटी आणि इतर गैरप्रकार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) नोटीस बजावून यासंदर्भात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1800405691133554884?s=19
परीक्षा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटले की, या परीक्षेच्या पावित्र्याला धक्का बसला आहे, त्यामुळे एनटीएकडून उत्तर आवश्यक आहे. परंतु त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने ही परीक्षा रद्द केली जाणार नाही. तसेच त्याच्या समुपदेशन प्रक्रियेला देखील स्थगिती देणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितले आहे. दरम्यान, एनटीएने सुप्रीम कोर्टाच्या नोटिसीला उत्तर दिल्यानंतर 8 जुलै रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत कोर्ट याप्रकरणी काय निकाल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
NEET परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी
तत्पूर्वी, नीट-यूजी 2024 ही परीक्षा 5 मे रोजी पार पडली. त्यानंतर या परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. नीट-यूजी 2024 या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून देशभरातील अनेक विद्यार्थी संघटनांकडून या परीक्षेला विरोध केला जात आहे. नीट-यूजी 2024 परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच या परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा देखील आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. नीट-यूजी 2024 परीक्षेच्या निकालात 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच 720 गुण मिळाले असल्याचे विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, नीट-यूजी 2024 या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षाचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. ही परीक्षा रद्द करून या परीक्षेतील गैरप्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.