सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला मोठा दिलासा; राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात सुनावणी होणार

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर गेल्या महिन्यात निकाल जाहीर केला होता. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला होता. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाच्या या याचिकेवर सुनावणी आता घेण्यास सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

https://x.com/ANI/status/1754382540000158111?s=20

सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची सहमती

तत्पूर्वी, राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी शिवसेनेच्या शिंदे गटाने आणि ठाकरे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निकाल जाहीर केला होता. यावेळी राहुल नार्वेकर यांनी ठाकरे आणि शिंदे गटाने एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या होत्या. यासोबतच एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची प्रतोद पदी केलेली निवड ही वैध असल्याने खरी शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचे राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालात म्हटले होते. या निकालाच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तर शिंदे गटाने देखील या निकालाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

जेष्ठ वकील कपिल सिब्बल ठाकरे गटाकडून युक्तीवाद करणार

तर सुप्रीम कोर्टाने आता राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास होकार दर्शवला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. मात्र, या सुनावणीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीवेळी जेष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टासमोर बाजू मांडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *