सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

बारामती, 18 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल पटेल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्यासह मान्यवर आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

https://twitter.com/mahancpspeaks/status/1780882116374319182?s=19

पुण्यात महायुतीची जाहीर सभा

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी सुनेत्रा पवार यांनी आज संविधानाचे निर्माते घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यातील पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुणे जिल्हा परिषदेच्या शेजारी आज महायुतीच्या नेत्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, मेधा कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार भीमराव तापकीर, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल, कांचन कुल, रमेश थोरात, वासुदेव काळे, माजी खासदार प्रदीप रावत यांच्यासह अनेक आजी, माजी आमदार महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

नणंद-भावजय यांच्यात लढत

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघ सर्वाधिक चर्चेत आहे. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. बारामती मतदार संघात यावेळी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजयींमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *