कन्हेरीच्या मारूतीला नारळ फोडून सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ

बारामती, 20 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीतील बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बारामती तालुक्यातील कन्हेरी गावातून करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कन्हेरी गावच्या मारूती मंदिरात नारळ फोडण्यात आला. याप्रसंगी, शिवसेना नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

https://twitter.com/mahancpspeaks/status/1781587228189426111?s=19

पवार कुटुंबीयांची परंपरा

दरम्यान, पवार कुटुंबीय आपल्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात कन्हेरी गावातूनच करतात. गेल्या 57 वर्षांपासूनची ही परंपरा आहे. शरद पवार यांनी 1967 साली त्यांच्या पहिल्या निवडणुकीत कन्हेरीच्या मारूती मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला होता. तेंव्हापासून आजवर ही परंपरा कायम आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कन्हेरीच्या मारूती मंदिरात नारळ फोडून सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर कन्हेरी येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवार, विजय शिवतारे यांसारख्या नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सुनेत्रा पवार यांनी मतदारांना निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले.

दोन्ही पवारांचा कन्हेरीतून प्रचार!

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल बारामती तालुक्यातील कन्हेरी गावातून केला होता. यावेळी शरद पवार यांनी कन्हेरीच्या मारूतीला नारळ फोडून सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरूवात केली. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या इतिहासात पवार कुटुंबीय प्रथमच एकमेकांच्या विरोधात लढणार आहे. आता दोन्ही पवारांनी कन्हेरीच्या मारूतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केल्यामुळे कन्हेरीचा मारूती कोणत्या पवारांना पावणार? याची चर्चा सध्या बारामती मतदारसंघात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *