उमेदवारी अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

पुणे, 18 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याच्याआधी सुनेत्रा पवार आणि त्यांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांची लढत सुप्रिया सुळे यांच्याशी होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://x.com/ANI/status/1780783946847904114

https://x.com/ANI/status/1780784780763881811

आजचा मोठा दिवस – सुनेत्रा पवार

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी फॉर्म भरणार आहे. म्हणून आम्ही देवाकडे आलो, प्रार्थना केली आणि त्याचे आशीर्वाद मागितले.” तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुका चालू आहेत. या निवडणुका अतिशय चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी गणपतीला साकडे घातले असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून यावेत – अजित पवार

जेव्हा नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून येतील, तेव्हा यामध्ये महाराष्ट्रातून मोठे योगदान आले पाहिजे. तसेच महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, अशी प्रार्थना देवाकडे केली असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. आम्ही ठरवले आहे की, महायुतीचा कोणीही उमेदवार अर्ज दाखल करेल, त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील. पण यामध्ये शक्तीदर्शन वगैरे असे काही नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती देखील अजित पवार यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *