सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार? मुंबईत बॅनर झळकले

मुंबई, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांना सोडून जात शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यासंदर्भात आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. तर राष्ट्रवादीतील या फुटीमुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अजित पवार गटाच्या एका बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या बॅनरवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदार संघाच्या भावी खासदार म्हणून उल्लेख केला आहे. मुंबईतील अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयाबाहेर आणि मंत्रालय परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहे. हे बॅनर मुंबईच्या माजी नगरसेविका प्रतिक्षा घुगे यांनी लावले आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद-भावजय जोडीची लढत होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

विराटला आपण कर्णधार पदावरून हटवले नाही – सौरव गांगुली

दरम्यान, बारामती मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र आता राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे बारामतीत पवार कुटुंबीयांमध्येच लढत होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित शिबिरात अजित पवार यांनी आपण येत्या लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा लढविणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांचे बारामतीच्या भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आल्यामुळे त्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

मराठा आरक्षण संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

तत्पूर्वी, सुप्रिया सुळे या 2009 पासून बारामती मतदार संघातील खासदार आहेत. सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत सलग 3 लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला होता. तर आता या बॅनरबाजीमुळे राष्ट्रवादीतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

One Comment on “सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार? मुंबईत बॅनर झळकले”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *