रविवार सुट्टीच्या दिवशी कृषिक 2025 ला नागरिकांची मोठी गर्दी!

कृषिक 2025 मध्ये सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी

बारामती, 19 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने माळेगाव खुर्द येथे ‘कृषिक 2025’ या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 16 जानेवारीपासून सुरू झाले असून ते 20 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. आज (दि.19) या प्रदर्शनाचा चौथा दिवस आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रदर्शनाला भेट दिल्याचे पहायला मिळाले. आज हजारो लोक याठिकाणी आले होते. कृषिक 2025 हे प्रदर्शन सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाले. सुट्टीचा दिवस असल्याने आज प्रदर्शन स्थळावर शेतकऱ्यांची तसेच इतर नागरिकांची सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली.



कृषिक 2025 प्रदर्शनात शेतकऱ्यांना विविध शेतीविषयक यंत्रसामग्री, विविध प्रकारची आधुनिक अवजारे, फवारणी यंत्रे, आंतर मशागतीसाठी उपयुक्त यंत्रे आणि सूक्ष्म सिंचन प्रणाली, एआय तंत्रज्ञानाचा वापर, यांच्यासह अनेक शेती विषयक माहिती आणि प्रात्यक्षिके पहावयास मिळाले. याशिवाय, रेशीम उत्पादन, मधुमक्षिका पालन आणि शेडनेटमध्ये भाजीपाला पिकवण्याच्या तंत्रज्ञानाची माहितीही शेतकऱ्यांना मिळाली. यामध्ये कृषी तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमता वाढवण्याचे उपाय शिकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली.



कृषिक 2025 प्रदर्शनात डॉ. अप्पासाहेब पवार कृषि तंत्रज्ञान दालन हे एक महत्त्वपूर्ण आकर्षण ठरले. या दालनात विविध कंपन्यांच्या स्टॉलवर शेतकऱ्यांना खते, औषधे, बी-बियाणे याबद्दल माहिती दिली गेली. यासोबतच, कृषी संशोधन केंद्रांद्वारे आणि विद्यापीठांच्या स्टॉलवर ताज्या संशोधनांबद्दल तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याठिकाणी शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

कृषिक 2025 प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी

कृषी विभाग, आत्मा, पुणे आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने शेतकरी कंपन्या तसेच बचत गट यांच्या दालनामध्ये देखील शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला, त्यावेळी त्यांनी विविध नव्या योजनांबद्दल माहिती घेतली. कृषिक 2025 या प्रदर्शनाने शेतकऱ्यांना शेती विषयक विविध तंत्रज्ञानांचा अनुभव दिला, ज्यामुळे त्यांना कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ‘कृषिक 2025’ हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण मंच ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या शेती विषयक अशा कृषिक प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *