दिल्ली, 01 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) ने एप्रिल ते जून 2025 च्या उन्हाळी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. या काळात भारतातील बहुतांश भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. यासंदर्भात हवामानशास्त्र विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
https://x.com/Indiametdept/status/1906689362072367164?t=qGUssNYQBwWCEuOiIHlNuw&s=19
उच्च तापमानाचा अंदाज
एप्रिल ते जून या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तथापि, पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये आणि पूर्व व मध्य भारताच्या काही भागांमध्ये तापमान सामान्य राहू शकते. तसेच देशात रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु वायव्य भारतात काही ठिकाणी तापमान सामान्य राहू शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कसे असेल तापमान?
याशिवाय, देशात एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटा अधिक येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे या काळात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच किमान तापमानाबाबत बोलायचे झाल्यास, उत्तर-पश्चिम आणि ईशान्य भारतातील काही ठिकाणी तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहू शकते, तर उर्वरित देशभरात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.
उष्णतेच्या लाटेचा धोका
भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एप्रिलमध्ये देशातील बहुतेक भागांमध्ये दिवसाचे तापमान वाढण्याची शक्यता आहे, परंतु दक्षिण भारत आणि वायव्य भारतात तापमान सामान्य राहू शकते. तसेच रात्रीचे तापमानही बहुतेक ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे, फक्त वायव्य आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहू शकते. एप्रिलमध्ये पूर्व आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटा अधिक येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शरीरात पाण्याची कमतरता, उष्माघात आणि इतर आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात. त्यामुळे वयोवृद्ध, लहान मुले आणि आधीपासून आरोग्य समस्या असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याची घ्यावी, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.
पाऊस कसा असेल?
देशातील उत्तर-पश्चिम भारत, द्वीपकल्पीय भारत, ईशान्य भारत आणि पश्चिम-मध्य भारताच्या काही भागांमध्ये पाऊस सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त राहू शकतो. मात्र, इतर काही भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. एकरीत, एप्रिल महिन्यात देशात पाऊस सरासरी पेक्षा कमी राहील, असा अंदाज आहे.