पुणे, 01 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज (दि.01) अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना पुढील 24 तास आयसीयूमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली असून काळजीचे कारण नाही. यासंदर्भातील माहिती वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आंबेडकर कुटुंबियांनी जनतेने दिलेला पाठिंबा आणि संदेशांबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
https://x.com/VBAforIndia/status/1852253754713657832?t=7dVguP8I4KeuqJSUGRo7JA&s=19
काल अँजिओग्राफी करण्यात आली
तत्पूर्वी, प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरूवारी (दि.31) पहाटे पुण्यातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेंव्हा डॉक्टरांनी त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू केले. यावेळी डॉक्टरांना प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांची काल अँजिओग्राफी करण्यात आली. तर प्रकाश आंबेडकर यांना आता पुढील 3 ते 5 दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रेखाताई ठाकूर प्रचाराचे काम पाहणार
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडीचे अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यंदाच्या विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढवत आहे. परंतु, निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने पक्षाचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकर यांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करीत आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर या निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती, माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या निवडणुकीतील प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडी पक्षाने दिली आहे.