पुणे, 23 जून: (विश्वजीत खाटमोडे) ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे हे गेल्या 9 दिवसांपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसले होते. या पार्श्वभूमीवर, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने शनिवारी रात्री मंगेश ससाणे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. त्यानंतर शिष्टमंडळाने मंगेश ससाणे यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. त्यावेळी राज्य सरकारकडून मिळालेल्या आश्वासनानंतर मंगेश ससाणे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे.
https://x.com/ChhaganCBhujbal/status/1804551001409777877?s=19
शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा
राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे आदी नेते उपस्थित होते. ओबीसी आंदोलकांच्या मागण्यांना अनुसरून ओबीसी आरक्षणास धक्का कसलाही धक्का लावला जाणार नाही, असे आश्वासन यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना दिले. सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या या आश्वासनांचे पत्र यावेळी छगन भुजबळ यांनी मंगेश ससाणे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर मंगेश ससाणे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
या मागण्यासाठी उपोषण सुरू होते
दरम्यान, ओबीसी आरक्षण संदर्भातील विविध मागण्यांसाठी मंगेश ससाणे हे 14 जूनपासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसले होते. राज्य सरकारने कुणबी मराठा संदर्भातील काढलेली सगेसोयरे अधिसूचना रद्द करण्यात यावी. तसेच इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यांसारख्या मागण्यांसाठी मंगेश ससाणे हे उपोषण करीत होते.