बीड, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तलाठी भरती परीक्षेत प्रथम आलेल्या उमेदवाराला 200 पैकी 214 गुण मिळाल्याचे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निदर्शनास आणले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या तलाठी भरती विरोधात महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तलाठी भरतीची एसआयटी मार्फत चौकशी आणि इतर मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप दिले जाईल, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने राज्य सरकारला दिला आहे.
https://twitter.com/Mpsc_Andolan/status/1747144399484838397?s=19
तलाठी भरती विरोधात विद्यार्थी आक्रमक
बीड मधील समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने आज बीड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे देखील आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलकांच्या या प्रमुख मागण्या आहेत
तलाठी भरती रद्द करून 45 दिवसांच्या आत एमपीएससी मार्फत फेरपरीक्षा घेण्यात यावी.
तलाठी आणि इतर सर्व भरती घोटाळ्याची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी करण्यात यावी.
यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात.
पेपरफुटी कायदा तत्काळ मंजूर करून लागू करण्यात यावा.
पोलीस भरतीची जाहिरात तत्काळ काढण्यात यावी.