नेपाळ, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ मोठा भूकंप झाल्याची घटना घडली आहे. तिबेटच्या शिगाझे शहरात मंगळवारी (दि.07) सकाळी 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. ज्यामुळे 53 जणांचा मृत्यू झाला असून 62 जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच या भूकंपाचे धक्के नेपाळमध्येही जाणवले, ज्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडावे लागले. चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशातील डिंगरी काउंटीमध्ये मंगळवारी आज 9:05 वाजता हा भूकंप (बीजिंग वेळेनुसार) झाला. भूकंपामुळे अनेक भागांतील इमारती कोसळल्या असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अनेक नागरिक बेघर झाले आहेत. दरम्यान, या भूकंपामुळे नागरिकांमध्ये सध्या घबराट पसरली आहे.
https://x.com/PTI_News/status/1876508464962502670?t=LSC9rdHk7MqNxs1_Kw42LQ&s=19
https://x.com/ANI/status/1876449380259320069?t=n2_GM4gObUr-WGjBuS6IfQ&s=19
नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के
त्याचवेळी यूएसजीएस अर्थक्वेक्स ने सांगितले की, आज सकाळी 6:35 वाजता नेपाळमधील लोबुचेपासून 93 किलोमीटर ईशान्येला मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. नेपाळमधील या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच याठिकाणी कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त सध्यातरी नाही. भूकंपामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या भूकंपामुळे झालेल्या संभाव्य हानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या प्रशासन बचाव आणि मदतकार्य राबवत आहे. या भूकंपाची तीव्रता अधिक असल्याने हानीचे प्रमाण मोठे असण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले असून, भूकंपग्रस्त भागांमध्ये मदतकार्य राबवले जात आहे. सध्या या नुकसानीचा तपशील उपलब्ध नसला तरी मोठ्या प्रमाणात भूस्खलनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, 2015 साली नेपाळमध्ये आलेल्या मोठ्या भूकंपाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि प्रचंड आर्थिक नुकसान केले होते. त्यामुळे या भूकंपाने आज पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि घराबाहेर सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के भारताच्या उत्तर भागातही जाणवल्याचे वृत्त आहे. तसेच भारताबरोबरच चीन, तिबेट, भूतानमध्येही या भुकंपाचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे या भागात सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तर पुढील तपशील व माहितीसाठी अधिकृत घोषणा आणि अहवालाची प्रतीक्षा आहे.