सोशल मीडिया संदर्भात कडक कायदा लागू करावा – शर्मिला ठाकरे

मुंबई, 10 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) डीपफेक संदर्भात सध्या चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशातच डीपफेक आणि सोशल मीडियावरील कमेंट्स याबाबत बोलताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. माझ्या मुलीला देखील सोशल मीडियावर वाट्टेल तसे मेसेज येत असतात. असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच यासंदर्भातील ब्रिटिशकालीन कायदा बदलण्याची आवश्यकता आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.



“माझ्यावर विश्वास ठेवा मी पण त्याचं परिस्थितीतून जात आहे. माझ्या मुलीला यूट्यूबवर अनेकजण वाट्टेल तसे मेसेज टाकतात. याप्रकरणी पोलीस त्या लोकांना अटक करतात. परंतू आपला ब्रिटिशकालीन कायदा इतका तकलादू आहे. त्यामुळे कीती अटक केली तरी त्यांना पुढे सोडावेच लागते. या कायद्यात बदल केला पाहिजे. यासंदर्भातील कायद्यात बदल केल्यानंतरच अशा प्रकरणांना आळा बसेल,” अशा शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या आहेत.



दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींचे डीफफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना, काजोल, कॅटरीना कैफ, आलिया भट्ट, क्रिती सेनन यांसारख्या अभिनेत्रीचे डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ नंतर मोठी खळबळ माजली होती. या घटनेचा अनेक सेलिब्रिटींनी तीव्र शब्दांत निषेध केला होता.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरबा खेळतानाचा डीपफेक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चिंता व्यक्त केली होती. तर केंद्र सरकार डीपफेक बाबत सतर्क झाले असून, यासंदर्भात केंद्र लवकरच नवा कायदा करणार असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. त्यामुळे असा कायदा लवकरात लवकर लागू केला पाहिजे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *