मुंबई, 29 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना होतात, हे गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केली होती. याप्रकरणातील दोषींना पाठिशी घातले जाणार नाही. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी विधानसभेत दिली.
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1763110162959913117?s=19
कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही!
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे? याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री डुप्लिकेट आणा!
तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असल्याचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडला होता. त्यावेळी विजय वडेट्टीवार हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा! अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या खोट्या स्वाक्षरी आणि शिक्के असलेली बनावट निवेदने प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली होती.