अकोला, 19 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे याठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी ही तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी 60 हून अधिक जणांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या अकोट पोलीस करीत आहेत.
https://x.com/ANI/status/1836706064684945856?s=19
60 हून अधिक जणांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट शहरातील नंदीपेठ परिसरात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एका गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक चालली होती. त्यावेळी या मिरवणुकीवर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अनमोल मित्तल यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून तणावाची परिस्थिती शांत केली आणि मिरवणूक पुन्हा सुरू केली. याप्रकरणी 60 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
शहरात शांततेचे वातावरण
अकोट शहरात सध्या शांततेचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अकोट शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच तेथील परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे. तर नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नये आणि कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.