मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना

दिल्ली, 04 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. दरम्यान, गेल्या काही काळापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. याबाबत अनेकजण प्रयत्न करीत होते. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे राज्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.

https://x.com/ANI/status/1841855333888577881?t=haxX9sENUOcbrFm2BxfG6Q&s=19

https://x.com/narendramodi/status/1841871539114840102?t=rb9SPOphfTK9SyhHjHwfHw&s=19

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

यासंदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केला आहे. “मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून केंद्राच्या निर्णयाचे स्वागत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. “माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके।” या ओळींचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले असून, आजचा दिवस मराठी भाषा आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा ऐतिहासिक क्षण असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. जगभरात सातासमुद्रापार मराठी भाषा, सण आणि उत्सव जोपासणाऱ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच यापुढे हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *