मुंबई, 16 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 च्या लेखी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.16 जुलै) जाहीर झाला आहे. ही परीक्षा यावर्षी जानेवारी महिन्यातील 20, 21 आणि 22 तारखेला पार पडली होती. या परीक्षेचा निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.
https://x.com/mpsc_office/status/1813096974410727624?s=19
या निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या अर्जातील दाव्याच्या पृष्ठ्यर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलाविण्यात येणार आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या निकालानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोगाकडून करण्यात येईल. त्यानुसार उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची तारीख आणि ठिकाणाची माहिती स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, असे लोकसेवा आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.
उमेदवारांनी त्यांच्या अर्जात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा अर्जातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासताना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. तसेच लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असेही लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.
मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करायची आहे, अशा उमेदवारांनी निकालाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन आयोगाने केले आहे. तसेच याच्या मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती लोकसेवा आयोगाने दिली आहे.