मुंबई, 12 जून: (विश्वजीत खाटमोडे) प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्यात ही फळपीक विमा योजना सन 2024-25 व 2025-26 या दोन वर्षात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांनी मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा भरून या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1800902297951887485?s=19
या फळ पिकांचा समावेश
राज्यात या फळपीक विमा योजनेत मृग बहार आणि आंबिया बहारातील डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष (क) इत्यादी पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तरी शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, त्यांनी वेळेत आपल्या फळ पिकांचा विमा भरून घ्यावा, असे कृषिमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे अनेकदा फळ पिकांवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारकडून हवामानावर आधारित फळपीक विमा राबविली जाते.
या कालावधीत पीक विमा भरावा
दरम्यान, फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहरात द्राक्ष (क), संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून निश्चित करण्यात आली आहे. तसेच मोसंबी आणि चिकू या पिकासाठी 30 जून, डाळिंब पिकासाठी 14 जुलै तर सीताफळ पिकासाठी 31 जुलै ही मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.