मुंबई, 10 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील जनतेला शुद्ध आणि निर्मळ दूध उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकार संबंधित विभागाला करेल. तसेच दुधात भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधिमंडळ सभागृहात दिली. राज्यातील नागरिकांना गायी आणि म्हैशीचे निर्मळ दूध मिळावे, यासाठी राज्य सरकार गंभीर आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी तसेच गायी आणि म्हशीचे निर्मळ दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अजून काही स्टाफ लागत असेल, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री लागत असेल, तर त्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती अर्थ मंत्रालयाकडून दिली जाईल, असेही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दुधाची भेसळ होऊ नये याच मताचे राज्य सरकार आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1810925360382628000?s=19
कडक कायदा केला होता परंतु…
दुधातील भेसळ हा सर्वांना भेडसावणारा आणि लोकांच्या जीवनाशी खेळणारा प्रश्न आहे. त्यामुळे यापूर्वी राज्य सरकारने कायदा केला होता. यामध्ये भेसळयुक्त दूध करणाऱ्याला फाशीची शिक्षा यावी, अशी तरतूद करण्यात आली होती. कायदा करून आपण दिल्लीला पाठवला होता. परंतु, दुर्दैवाने आम्ही दिलेल्या कायद्यावर राष्ट्रपतींनी सही केली नाही. दूधभेसळी सारख्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देता येत नाही, असे राष्ट्रपतींनी म्हटले होते, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
कठोर भूमिका घेण्याची सरकारची तयारी
येत्या काही दिवसांत दूध भेसळ रोखण्यासाठी तसेच याबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात येईल. या बैठकीत भेसळ रोखण्यासंदर्भात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या कशा दुरुस्त करता येतील? याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले. सध्या राज्यातील झोपडपट्टी तसेच इतर भागांत मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याठिकाणी अमुल आणि गोकुळ दुधाच्या पिशव्या तयार करून या दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी घातले जाते तसेच इंजेक्शन सारखे प्रकार केले जात आहेत. सध्या दुधाचे दर जास्त असल्यामुळे एका पिशवी मागे त्यांना 60 ते 70 रुपये मिळतात. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. या भेसळयुक्त दुधामुळे आजार बळावतात. यासंदर्भात कडक भूमिका घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.