पुणे, 25 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी मुंबईकडे जाण्यासाठी पदयात्रा काढली आहे. त्यांची ही पदयात्रा सध्या लोणावळ्यात आहे. तर ही पदयात्रा आता मुंबईकडे रवाना होणार आहे. या पदयात्रेला मराठा बांधवांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या या पदयात्रेत सध्या लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र, मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन स्थगित करावे, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोणावळ्यात दाखल झाले आहे.
चर्चेत कोणता तोडगा निघणार?
मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. सरकारच्या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे यांचा समावेश आहे. यावेळी हे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून मुंबईतील आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बराच वेळापासून त्यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या या चर्चेत मराठा आरक्षण संदर्भात कोणता तोडगा निघतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणावर ठाम: जरांगे पाटील
तत्पूर्वी या चर्चेआधी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जो काही निर्णय होणार तो मराठा समाजाला विचारून घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच शिष्टमंडळाशी चर्चा करण्याच्या आधी मराठा समाजासोबत बोलणार असल्याचे जरांगे पाटील यावेळी म्हणाले होते. तसेच आम्ही मराठा आरक्षणावर ठाम आहोत. सरकारने मराठा राज्यात मराठा आरक्षण लागू केले आणि त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केली, तरच आमचे हे आंदोलन थांबण्यात येईल. अन्यथा, आम्ही माघार घेणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी ठामपणे सांगितले आहे.