मुंबई, 27 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले आहेत. तर यातील 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना सध्या मुंबईतील केबी भाभा महानगरपालिका रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. या संदर्भातील बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. घाईघाईत रेल्वेमध्ये चढत असताना हा अपघात झाला. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर रविवारी (दि.27) पहाटे 5.56 वाजता ही घटना घडली.
https://x.com/ANI/status/1850389620636459194?t=LMScUbP3vedo5gPVj6HOyQ&s=19
https://x.com/ANI/status/1850400332150370570?t=hOVTa0hX5epKU4ki8Jbc9w&s=19
आज पहाटे घडली घटना
जास्त गर्दीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या सणासाठी आपल्या घरी जाण्यासाठी वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यावेळी स्थानकावर रेल्वे येताच लोक त्यात चढण्यासाठी धडपड करू लागले. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे बोलले जात आहे. परंतु, या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा तपास सध्या केला जात आहे. या चेंगराचेंगरीचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. ज्यामध्ये जखमी लोक जमिनीवर बेशुद्ध पडलेले आहेत. रेल्वे पोलीस कर्मचारी आणि इतर प्रवासी जखमींना स्ट्रेचरवर घेऊन जात आहेत. तसेच यामध्ये प्रवाशांचे बुट, चप्पल आणि इतर वस्तू पडल्याचे दिसत आहेत. या अपघातामुळे सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी दिवाळीनिमित्त मुंबईत नोकरी आणि व्यवसाय करणारे लोक मोठ्या संख्येने आपल्या घरी जात असतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात नेहमी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. परंतु, आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नसल्याने गोरखपूरला जाणाऱ्या या ट्रेनमध्ये चढण्यासाठी आज प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. यातील बहुतांश प्रवासी हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत.