मुंबई, 04 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप आज मागे घेतला आहे. पगारवाढ करावी तसेच अन्य काही मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने कालपासून (दि.03) बेमुदत संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना बुधवारी (दि.04) बैठकीसाठी बोलावले होते. ही बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6 हजार 500 रुपयांची वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यांनतर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घेतला.
https://x.com/samant_uday/status/1831370067420106758?s=19
मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची पगार वाढ केलेली आहे. ही वाढ एप्रिल 2020 पासून असणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी मूळ वेतनात सरसकट 5000 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल 6500 रुपयांनी वेतनात वाढ केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घेतला. तसेच कर्मचाऱ्यांच्या इतर काही मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे या बैठकीत सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात या मागण्यांचा संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
प्रवाशांना मोठा दिलासा
तत्पूर्वी, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस होता. या संपात राज्यभरातील एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणची एसटी बस सेवा बंद झाली होती. या संपामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांची मोठी गैरसोय होऊ लागली होती. त्यामुळे एसटी बसचा संप कधी मिटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात एसटी बसेस धावताना दिसणार आहेत.