पुणे, 03 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या सर्व मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार यासंदर्भात कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सणासुदीच्या काळात एसटीचा संप
दरम्यान, राज्यात सध्या सणासुदीचा काळ आहे. तसेच गणेशोत्सव देखील तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे याचा मोठा परिणाम प्रवाशांवर होणार आहे. या संपामुळे गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील विद्यार्थी आणि चाकरमान्यांना देखील या संपाचा फटका बसू शकतो.
या आहेत मागण्या –
महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने हा संप पुकारला आहे. या संपात राज्यातील एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील वेतन मिळावे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक तसेच वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक देण्यात यावा. जाहीर केलेल्या मूळ वेतनात सरसकट 5 हजार रुपये देण्यात यावे. जुन्या झालेल्या बस बंद करून स्वतःच्या मालकीच्या नवीन बस खरेदी करा. एसटीचे खाजगीकरण करू नये. इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना सुरू करावी. सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये वर्षभराचा पास मोफत देण्यात यावा. यांसारख्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
राज्य सरकार काय निर्णय घेणार?
या मागण्यांबाबत राज्य सरकारने तातडीने बैठक बोलवावी आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने केली आहे. तसेच जोपर्यंत या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.