लातूर, 03 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लातूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. लातूरहून अहमदपूरकडे जाणारी एसटी बस दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाल्याची घटना घडली. हा अपघात आज (दि.03) दुपारच्या सुमारास झाला. या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
https://x.com/airnews_mumbai/status/1896498202062565767?t=qpX10kJvnsWfViybSlZNbw&s=19
घटना सीसीटीव्हीत कैद
ही दुर्घटना महामार्गावर घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, ही एसटी बस सरळ मार्गाने जात होती. परंतु, त्याचवेळी एक दुचाकीस्वार अचानकपणे या बसला आडवा आला. या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बस पलटी झाली. या अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली. तसेच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. यावेळी त्यांनी जखमी प्रवाशांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातात 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे
या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. या अपघातामुळे एकदा रस्ते सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून, अशा प्रकारच्या निष्काळजी वाहनचालकांमुळे स्वतःचे आणि इतर प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.